19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयहिंसा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही : राजनाथ सिंह

हिंसा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही : राजनाथ सिंह

ऐझॉल : मणिपूरमध्ये अधून-मधून हिंसक घटना घडतच आहेत. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या मुद्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला असला तरी गेल्या ९ वर्षांत ईशान्य भागात शांतता आहे. राजनाथ सिंह यांनी मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांना एकत्र बसण्याचे, बोलण्याचे आणि विश्वासाची कमतरता दूर करण्याचे आवाहन केले. हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. आपल्याला मनापासून संवाद साधण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, मला प्रामाणिकपणे सांगायचे आहे की, मणिपूरमधील हिंसाचार कोणत्याही राजकीय पक्षाने भडकावला नव्हता, उलट तेथे परिस्थिती बिघडली होती. आम्हाला विश्वास आहे की, जोपर्यंत ईशान्येचा खऱ्या अर्थाने विकास होत नाही, तोपर्यंत सशक्त, समृद्ध, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

तसेच मणिपूर हिंसाचारावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला आणि मिझोराम आणि ईशान्येसह संपूर्ण देशाला काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. विधानसभेच्या ४० जागांसाठी मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मणिपूरमधील हिंसाचार हा तेथील मोठा मुद्दा आहे. येथे सत्ताधारी नॅशनल फ्रंट (एमएनएफ), झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम), काँग्रेस आणि भाजप रिंगणात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR