ऐझॉल : भारत-म्यानमार सीमेवर अरकान आर्मी (एए) आणि म्यानमार आर्मीमध्ये (एमए) सत्तेसाठी भीषण संघर्ष सुरु आहे. दरम्यान, अरकान आर्मीच्या हल्ल्यानंतर म्यानमार आर्मीचे सुमारे १५१ सैनिक भारतीय सीमेवरील मिझोरामच्या लांगताई जिल्ह्यात प्रवेश केला. येथे आल्यानंतर त्यांनी लंगताई येथील तुसेंटलाँग येथे आसाम रायफल्सशी संपर्क साधला. म्यानमारच्या सैनिकांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आराकान आर्मीने आंतरराष्ट्रीय सीमेजवळील त्यांच्या छावण्या ताब्यात घेतल्या, त्यामुळे त्यांना शस्त्रे घेऊन पळून जावे लागले.
भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून भारताजवळील सीमा भागात म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. मिझोराममध्ये दाखल झालेले म्यानमारचे काही सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. सध्या म्यानमारचे सर्व सैनिक आसाम रायफल्सच्या ताब्यात आहेत.
या सैनिकांना काही दिवसांनी त्यांच्या देशात परत पाठवले जाणार आहे. सध्या भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारचे लष्करी सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे. लोकशाही समर्थक मिलिशिया पीपल्स डिफेन्स फोर्सने त्यांच्या छावण्या ताब्यात घेतल्यानंतर एकूण १०४ म्यानमार सैनिक नोव्हेंबरमध्ये मिझोराममध्ये पळून गेले. भारतीय हवाई दलाने त्यांना मणिपूरमधील मोरे येथे विमानाने नेले होते.
म्यानमार लष्कराच्या लढाऊ विमानांनी गेल्या शुक्रवारी भारत-म्यानमार सीमेवरील अराकान आर्मी तळावर बॉम्बहल्ला केला होता. यामध्ये ५० सैनिकांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटाचा भारतीय सीमेवर काहीही परिणाम झाला नाही.