जिंतूर : येथील विद्या व्हॅली इंग्लिश स्कूलचे कलाविष्कार हे वार्षिक स्नेहसंमेलन दि. २९ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे पार पडले. या स्नेहसंमेलनामध्ये नर्सरी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. विशेषता स्त्री बळकटीकरण व शालेय जीवन भारतीय संस्कृतीची झलक देशभक्तीपर गीत अशा विविध कार्यक्रमांनी कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलन गजबजून गेले. यावेळी विद्यार्थ्यांचा अभिनय व कलाविष्कार पाहून उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.
या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश सरोदे, प्रमुख पाहुणे म्हणून त्र्यंबक पोले गटशिक्षण अधिकारी, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद, परभणी येथील सरस्वती भुवनचे संस्थापक रैसुद्दीन सय्यद, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल परभणी संस्थापक अध्यक्ष प्रिया ठाकूर व विद्या व्हॅली शाळेच्या संस्थापक अध्यक्ष सौ. प्रिया देशमुख, मुख्याध्यापिका रझिया पठाण यांची उपस्थिती होती. प्रथमत: दीप प्रज्वलन सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात शाळेच्या संस्थापिका सौ. प्रिया देशमुख यांनी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध उपक्रम व आत्तापर्यंतच्या शाळेचा प्रवास तसेच येथून १०वी उत्तीर्ण करून गेलेल्या विद्यार्थ्यांनी नामांकित कॉलेजमध्ये मिळवलेले प्रवेश याबद्दल सांगितले. तसेच भविष्यात शाळा स्वत:च्या वास्तूमध्ये प्रवेश करून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, भौतिक सर्वगुणसपन्न सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध राहील याचे आश्वासन दिले.