सोलापूर : घातक शस्त्राचा वापर करून लोकांमध्ये दहशत पसरवून ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या संदीप प्रल्हाद चव्हाण (वय ३८, रा. पारधी वस्ती, मुळेगाव) या सराईत गुन्हेगाराला अखेर पोलिस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाईचे आदेश बजावले. त्यानुसार त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली.
यातील संदीप चव्हाण याच्याविरुद्ध एमआयडीसी, जोडभावी पेठ, सलगर वस्ती पोलिस ठाण्यात जबरी घरफोडी, बेकायदा जमाव जमवून सशस्त्र हल्ला करून धमकावणे, खंडणी उकळणे अशा गंभीर प्रकारचे १० गुन्हे पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवर आहेत. या गुन्ह्यापासून तो परावृत्त व्हावा म्हणून पोलिसांनी सन २०२१ मध्ये कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार तडीपार कारवाई केली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली नाही. त्याने गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी त्याच्याविरुद्ध १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबद्धतेचे आदेश काढले.