28.6 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यव्यापी रेशन दुकानदारांच्या संपात फूट

राज्यव्यापी रेशन दुकानदारांच्या संपात फूट

मुंबई : राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून म्हणजेच आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. १ जानेवारी २०२४ पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांनी बेमुदत संपाची हाक दिली होती. मात्र, या संपात आता फुट पडली आहे. ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर फेडरेशन पुणे यांनी संपात सहभागी होण्यास नकार दिला आहे. सोबतच, राज्यातील जवळपास २५ हजाराहून अधिक रेशन दुकानदार संपात सहभागी नसल्याचा देखील दावा ‘ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर फेडरेशन’च्या वतीने करण्यात आला आहे. तसेच, सरकारने तोडगा काढण्याचे आश्वासन आधीच दिले असून, संपाला अर्थ नसल्याचे फेडरेशननेच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत. मात्र, असे असतानाच या संपात मोठी फुट पडली असल्याचे चित्र आहे. ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर फेडरेशन पुणे यांनी संपात सहभागी होण्यास नकार दिल्याने रेशन दुकानदारांच्या संपात फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात सुमारे ५३ हजार रेशन दुकानदार असून, त्यांच्या अनेक प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्या मागण्यासाठी रेशन वेळोवेळी करण्यात येणा-या आंदोलनाची आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप रेशन दुकानदारांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक घेतली, मात्र कोणताही ठोस निर्णय न घेता फक्त आश्वासन देण्यात आले.

त्यामुळे महासंघाच्यावतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने आजपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे. परंतु, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर फेडरेशनच्या वतीने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आल्याने संपात फुट पडली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR