मंगळवेढा – हुंड्यातील पाच तोळे सोने आणून दे असे म्हणून एका २८ वर्षीय विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रेल्वे लोकोपायलट तथा पती जगदीश महादेव कट्टीमनी, सासरे महादेव धर्मण्णा कट्टीमनी (रा. विजापूर रोड) या दोघांविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी विश्वेश्वरी कट्टीमनी (सध्या रा. डोणज) हिचा विवाह जगदीश कट्टीमनी यांच्याशी मरवडे येथील लतीफ मंगल कार्यालयात झाला होता. लग्नानंतर फिर्यादी ही सासरी नांदायला गेल्यानंतर काही दिवसानंतर तिचा पती लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही, पाहुण्यांची व्यवस्था नीट केली नाही असे म्हणून वारंवार शिवीगाळ करीत असे. लग्नात फिर्यादीच्या वडिलांनी फिर्यादीच्या पतीस पूर्ण कपड्याचा आहेर व पाच तोळे सोने घातले असताना माहेरकडील लोकांनी केवळ ७० हजारांत लग्न केले आहे असे म्हणत आणखी पाच तोळे सोने द्या अशी मागणी पती करत असे. पती हे भारतीय रेल्वे सेवेत असिस्टंट लोकोपायलट म्हणून नोकरीस आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये फिर्यादी ही आठ महिन्याची गरोदर असताना आरोपीने सोने आण म्हणून मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. अशा प्रकारे वारंवार शारीरिक, मानसिक छळ करीत असे.
मंगळवेढा येथील महिला समुपदेशन केंद्रात तक्रार दिल्याने पतीने मी व्यवस्थित नांदवेन, हुंडा मागणार नाही असे सांगितले होते. मात्र मारहाण करुन जखमी केले. तसेच आई-वडिलांबरोबर मोबाइलवर बोलू देत नव्हते. मोबाइल काढून घेतला अशा प्रकारे छळ केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.