धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील कुमाळवाडी शिवारात एकाचा निर्घूण खून झाल्याची घटना सोमवार दि. १३ जुलै उघडकीस आली होती. याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून यामध्ये पत्नीनेच प्रियकराच्या साथीने पतीचा काटा काढल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पत्नीसह ३ आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील कुमाळवाडी शिवारात सोमवारी (दि.१३) एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आले होते. त्यामुळे धाराशिव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि हाके, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ व स्टाफ घटनास्थळी रवाना झाले. यावेळी त्यांना सदर घटनास्थळी प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यावरून सदर ईसमाचा कोणीतरी खुन केला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. सदर ठिकाणी घटनास्थळाचे बाजूला एक हिरो होन्डा स्प्लेंडर मोटारसायकल उभी होती. सदर मोटार सायकलच्या मालकाचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर काढुन मयताची ओळख पटवली. मयताचे नाव दगडू देशमुख राहणार येडशी असे असल्याचे समजले.
सदरील तपासादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी राऊत व स्थानिक गुन्हेचे पोलिस निरीक्षक विनोद ईज्जपवार व पथकसुद्धा घटनास्थळी आले. संशयित आरोपींचा शोध सुरू केला. तपासामध्ये संशयीत आरोपी व मयताची पत्नी यांचे अनैतिक प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली त्यावरुन पोलिसांनी संशयीत आरोपी बालाजी महादेव पायघन(३५) रा. सातनाक वस्ती, पांगरी ता. बार्शी जि. सोलापूर याचा शोध घेतला असता तो त्याच्या मेहुण्यासोबत पुणे येथे गेला असल्याचे समजले. पुणे पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपीत बालाजीचा शोध घेतला असता तो त्याचा दुसरा साथीदार सोमनाथ सातनाक याच्यासोबत मिळून आला. सदरचा खून मयताच्या पत्नीच्या सांगण्यावरून बालाजी व सोमनाथ या दोघांनी चाकूने वार करून व दगडाने ठेचून केला असल्याचे सांगितले. आरोपी बालाजी महादेव पायघन, सोमनाथ सातनाक व मयताची पत्नी दैवशाला संतोष देशमुख यांना नमूद गुन्ह्यात अटक केली असून पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे अधिक तपास करत आहेत.
सदरची कामगिरी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि हाके, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ, पोलिस हवालदार माचेवाड, खोसे, गादेकर, ढगारे, घुगे, पोलीस नाईक सावंत, पोलिस शिपाई पडवळ, आरसेवाड, स्वामी, गवळी, बनाळे, महिला पोलिस हवालदार बांगर, सोन्ने यांनी केली.
















