मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक बनणा-या रश्मी शुक्ला या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. रजनीश शेठ महासंचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होणार, अशी चर्चा होती मात्र दरम्यानच्या काळात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. मात्र, आता रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीने राज्याला पोलिस महासंचालक मिळाल्या आहेत. रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात.
रजनीश शेठ निवृत्त झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्या नावाची महासंचालक पदासाठी चर्चा होती. मात्र त्या या पदासाठी इच्छुक नसल्याचीदेखील बातमी होती. यामुळे विवेक फणसाळकर यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाने २९ डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा झाली होती. त्या नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेऊन रश्मी शुक्ला यांचे नाव निश्चित केले. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या अधिकारी असून त्यांना पुढे ६ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना रश्मी शुक्ला यांचे नाव राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली होती मात्र नंतर या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. त्या नंतर रश्मी शुक्ला या मुंबईच्या पोलिस आयुक्त होतील, अशीही चर्चा होती. अखेर त्यांची नियुक्ती राज्याच्या पोलिस महासंचालकपदी करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला पोलिस महासंचालक मिळाल्या आहेत.
फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल
काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी आयपीएस पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाची सूत्रे येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पदावर आता त्यांचीच नियुक्ती करण्यात आली.
विरोधकांची टीका
रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली आहे. पूर्वी विनापरवानगी फोन टॅप करायच्या आता तर अधिकृत फोन टॅप करायची परवानगी मिळाली आहे. यामुळे विरोधकांनी आता अधिक सावध रहायला हवे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. राज्यात हे सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना बढती मिळणार हे माहिती होतेच, असा खोचक टोलाही खडसे यांनी लगावला आहे.