35.6 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeमहाराष्ट्रअजून मी आठ महिने मुख्यमंत्री

अजून मी आठ महिने मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मुंबई : अजून मी आठ महिने मुख्यमंत्री आहे, आपल्याला खूप फिरावे लागणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील इतर पक्षांमधील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर उपस्थितांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. येत्या काही दिवसांत विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रतेचा निकाल येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला आता महत्त्व आले आहे.

आज मुंबईतील ‘नंदनवन’ बंगल्यात काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. शिवसेना शिंदे गटाने पालघर जिल्ह्यात ठाकरे बंधूंना धक्का दिला आहे. पालघर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या अनेक पदाधिका-यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याशिवाय, काँग्रेस पदाधिकारी आणि काही सरपंचांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. त्याशिवाय, ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील वरळी येथील माजी नगरसेविका रत्ना महाले यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सरकार काम करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ सर्वांत लोकप्रिय आहे. राज्यातील २ कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील विकास ठाणेसारखा झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी अजून ८ महिने मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले. आपल्याला खूप कामे करायची असून बरेच फिरायचे असल्याचे त्यांनी म्हटले. शिवसेना आमदार अपात्रतेची कारवाईची टांगती तलवार असतानाही आपण अपात्र होणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR