सोलापूर : रेल्वेगाड्यांना उशीर होत असल्याने प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे; पण त्यातच आता सोलापूरकरांसाठी महत्त्वाची असणारी हुतात्मा एक्स्प्रेसच्या बी ८ या डब्यातील टँकमधील पाणी गळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
यामुळे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जात असताना प्रवाशांना भिजत जावे लागत
आहे. सोलापूरकरांच्या सोईच्या गाड्या म्हणून हुतात्मा, सिद्धेश्वर, इंटरसिटी, आदी गाड्यांकडे पाहिले जाते; पण गेल्या अनेक दिवसांपासून या गाड्या नियोजित वेळेत येत नसल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. त्यातच पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या बी ८ या डब्यातीलशौचालयाच्या जवळ असणाऱ्या छताच्या टँकमधून पाणी गळत होते. याबाबतचा व्हिडीओ एका प्रवाशानेशूट करून तो सोशल मीडियावर टाकला आहे. पाणी गळत असल्याने प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाताना भिजून जावे लागत आहे. शिवाय विनाकारण पाणी वाया जात असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.
जर गाडीच्या टाकीमध्ये लिकेज असेल तर त्याची दुरुस्ती करूनच ही गाडी सोलापूरला सोडण्याची गरज होती; पण तसे झाले नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे, त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असे प्रवासी सेवा संघ अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगीतले.