कोलकाता : कोलकाता पोलिसांना दहशतवादी १११ ग्रुपने शुक्रवारी एक ईमेल पाठवला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय संग्रहालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली. ईमेल पाहिल्यानंतर बॉम्बशोधक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पर्यटकांना आठवडाभरासाठी प्रवेश बंदी करण्यात आली. भारतीय संग्रहालयात अनेक बॉम्ब ठेवण्यात आले असून ते कोणत्याही क्षणी फुटू शकतात, असे धमकीच्या मेलमध्ये म्हटले आहे. या मेलनंतर संग्रहालयाच्या आत तपासणी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक भागात बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या असून त्यातील बहुतांश धमक्या खोट्या निघाल्या आहेत. बंगळुरूमध्येही अशाच धमक्यांमुळे सर्व शाळा दिवसभर बंद ठेवण्यात आल्या होत्या. एका संशयित व्यक्तीने कर्नाटकातील राजभवन उडवून देण्याची धमकी दिली होती. मात्र, अटकेनंतर या व्यक्तीने आपली असेच हे कृत्य केल्याचे सांगितले. नुकतेच २२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेक प्रसंगी राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.