नवी दिल्ली : भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई सोमालियाच्या किनार्यावरील एमव्ही लीला नॉरफोक या अपहरण झालेल्या जहाजाजवळ पोहोचली आहे. भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांना अपहरण केलेले जहाज मुक्त करण्याबाबत इशारा दिला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की जहाजावरील भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत आणि मरीन कमांडो मार्कोस ऑपरेशनसाठी सज्ज असून ते अपहरण झालेल्या जहाजाजवळ आहेत. ‘एमव्ही लीला नॉरफोक’ या मालवाहू जहाजाचे गुरुवारी संध्याकाळी सोमालियाच्या किनाऱ्यावर अपहरण करण्यात आले. जहाजावर १५ भारतीय आहेत.
नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील सागरी घटनेला त्वरित प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये लायबेरियन-ध्वज असलेल्या जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते म्हणाले की जहाजाने यूकेएमटीओ पोर्टलवर एक संदेश पाठविला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सुमारे पाच ते सहा अज्ञात सशस्त्रधारी लोक जहाजावर चढले आहेत.
जहाजातून संदेश मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की नौदलाच्या सागरी गस्ती विमानाने जहाजावर उड्डाण केले आणि जहाजाशी संपर्क प्रस्थापित झाला, ज्यामुळे चालक दलाच्या सुरक्षिततेची खात्री झाली. एमव्ही लीला नॉरफोक या मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची नोंद यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) या ब्रिटिश लष्करी संस्थेने गुरुवारी केली. हे धोरणात्मक जलमार्गांमधील विविध जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवते.