इंफाळ : गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. येथील न्यू लांबुलेन येथील चार घरे आगीमुळे जळून खाक झाली आहेत. हिंसाचार सुरू झाल्यापासून या घरात कोणीही वास्तव्यास नव्हते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन दलाच्या किमान तीन गाड्या घटनास्थळी हजर होत्या. मात्र आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येणार आहे.
ही घरे एका विशिष्ट समाजाची असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ३ मे रोजी उसळलेल्या हिंसाचारापासून या जागा रिक्त आहेत. मालमत्तेच्या नुकसानीचेही मूल्यांकन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही घटना परिसरातील शांतता बिघडवण्याचा कट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी मे महिन्यापासून कुकी आणि मेईतेई समुदायांमधील वांशिक संघर्षामुळे १८० हून अधिक लोक मारले गेले असून शेकडो जखमी झाले आहेत.