पूर्णा : येथील रेल्वेस्टेशन जंक्शन असल्याने या ठिकाणी रेल्वेसह दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. परंतू मागील काही महिन्यांपासून रेल्वेस्टेशन परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते. प्लॅटफॉर्म क्रंमांक चारच्या शहराकडील उत्तर दिशेच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरात कंपाऊंडवाल भिंती लगत अनेक जण उघड्यावर लघुशंका, शौच करीत असून याच ठिकाणी ओला कचरा टाकल्यामुळे मोठी दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांना नाक मुठीत धरून जावे लागत असल्याचे वृत्त दैनिक एकमत वृत्तपत्रातून दि. ५ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात आले. या वृत्ताची तात्काळ दखल घेत रेल्वे प्रशासनाने रेल्वे परीसरातील संबंधित ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवल्याने रेल्वे स्थानक परीसराचे रूपडे पालटले असून दैनिक एकमतच्या वृत्ताच्या हा दणका असल्याचे मत नागरीकातून व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वेस्थानक व परीसरातील अनेक समस्या बाबत दैनिक एकमत वृत्तपत्रात दि.५ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यामध्ये डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे मोकळ्या जागेत ओला कचरा टाकला जात आहे. या घाणीमुळे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये डासांचा प्रसार वाढून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक चार व एक नंबरवर प्रसाधन ग्रहांमध्ये नेहमी स्वच्छता केली जात नसल्यामुळे तेथेही मोठ्या प्रमाणात दर्गुंधीचा सामना प्रवाशांना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच या ठिकाणचे लाईट सुद्धा बंद असल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्लॅटफॉर्म भिंती लगत अनेकदा सुका कचरा जाळण्यात येत असून यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती.
रेल्वेचे स्वच्छता अधिकारी व संबंधित कंत्राटदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांमधून केला होता. संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. अधिका-यांना प्रवाशांनी स्वच्छतेची विचारणा केली असता कर्मचारी कमी असल्याचे उत्तर दिले जाते. अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नाकडे नांदेडचे विभागीय व्यवस्थापक नीती सरकार लक्ष देतील देतील का? तसेच संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टदाराची चौकशी करून कारवाई करतील का? असा प्रश्न प्रवाशांसह परिसरातील नागरिकांना पडला आहे.
वृत्त प्रकाशित होताच स्वच्छता मोहिमेला सुरूवात
पूर्णा रेल्वे परीसरातील कचरा व दुर्गंधी बाबत वृत्त प्रकाशित होताच या वृत्ताची सॉफ् ट कॉपी दैनिक एकमतचे पूर्णा प्रतिनिधी यांनी नांदेड विभागाच्या डीआरएम निती सरकार व पूर्णा येथील स्वच्छता अधिकारी यांना पाठवून दिली होती. या प्रकाशित वृत्ताची तात्काळ दखल घेत पूर्णा येथील रेल्वेच्या अधिका-यांनी तात्काळ स्वच्छता मोहिम राबवून संपूर्ण परीसर स्वच्छ केला आहे. स्वच्छता मोहिमेमुळे रेल्वे परीसराचे रूपडे बदलून गेले आहे. स्वच्छता मोहिम राबवण्यात आल्यानंतर नागरीकांतून दैनिक एकमतच्या वृत्ताचा दणका असल्याची चर्चा अनेक ठिकाणी ऐकावयास मिळत होती.