भारताची पहिलीच सौरमोहीम, आदित्य एल-१ ही यशस्वीपणे पार पाडून इस्रोने नवा इतिहास रचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ हा उपग्रह पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर असणा-या एल-१ या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात आला. सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून हा उपग्रह या ठिकाणी पोहोचला. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
पंतप्रधान मोदींनी केले कौतुक
इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी भारताच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. अगदी गुंतागुंतीची अशी अंतराळ मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन.. मी आणि संपूर्ण देश आज या वैज्ञानिकांचे कौतुक करत आहे, अशा आशयाची पोस्ट पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवरून केली.
आज (६ जानेवारी) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इस्रोच्या वैज्ञानिकांनी या उपग्रहाला एल-१ बिंदूवरील हेलो कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी मॅन्यूव्हर राबवले. अगदी अलगदपणे आदित्य उपग्रह या ठिकाणी ठेवण्यात आला. आता इथूनच पुढील पाच वर्षेे तो सूर्याचे निरीक्षण करेल, आणि मिळालेली माहिती इस्रोला पाठवेल.
आदित्य उपग्रहासोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. यातील चार पेलोड हे थेट सूर्याचे निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतील, तर इतर तीन पेलोड हे सोलार इमिशनचा अभ्यास करतील. पुढील पाच वर्षे आदित्य सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे. यातून कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इंजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियांची माहिती मिळणार आहे. अंतराळातील हवामानाचा अभ्यासही यामुळे करता येणार आहे.