पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची त्याच्याच साथीदाराने काहीजणांसह मिळून गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण पुणे हादरले आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात भरदिवसा शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मास्टरमाईंड नामदेव पप्पू कानगुडे ऊर्फ मामा, मोहोळच्या सोबत राहणा-या साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकरसह ८ जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर रात्री पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शरद मोहोळवर अन्त्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
मोहोळच्या अन्त्ययात्रेत त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पुण्याच्या रस्त्यावर समर्थक तरुणांनी आपल्या दुचाकींनी जणू रॅलीच काढली होती.
या गर्दीचे फोटो आणि व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोहोळ अन्त्ययात्रेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. कारण, शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यात गँगवॉर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या पोलिस या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.