नवी दिल्ली : उत्तर अरबी समुद्रातून एम.व्ही.लिला नॉरफोल्क या व्यापारी जहाजाच्या अपहरणाचा कट उधळून लावणा-या भारतीय नौदलाने आता चाच्यांच्या संशयास्पद जहाजाचा शोध सुरू केला आहे. या व्यापारी जहाजावर २१ जण उपस्थित होते त्यातही पंधरा भारतीयांचा समावेश होता, अशी माहिती अधिका-यांनी दिली. चाच्यांच्या तावडीतून सुटलेल्या व्यापारी जहाजावरील प्रॉपल्शन सिस्टिम, ऊर्जा पुरवठा आणि स्टिअरिंग गिअरच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. काही तांत्रिक दुरुस्त्या झाल्यानंतर या जहाजाचा पुढील प्रवास सुरू होईल.
या व्यापारी जहाजाला संरक्षण देण्याचे काम भारतीय युद्धनौका करणार आहेत. अपहृत व्यापारी जहाजाच्या सुटकेसाठी नौदलाने युद्धनौका, सागरी टेहळणी विमान ‘पी-८आय’, हेलिकॉप्टरसह आणि ‘एमक्यू९बी’ हे प्रिडेटेर ड्रोन तैनात केले होते. या व्यापारी जहाजाने काही अज्ञात शस्त्रधारी माणसांनी घुसखोरी केल्याचा संदेश ब्रिटनच्या ‘मेरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स पोर्टल’ला पाठविला होता. या संदेशामुळेच संबंधित व्यापारी जहाजाचे अपहरण झाल्याची बाब उघड झाली होती.
आयएनएस चेन्नईचा पुढाकार
या व्यापारी जहाजाच्या सुटकेमध्ये भारतीय नौदलाच्या कमांडोंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्यामुळे या जहाजावरील २१ कर्मचा-यांची सुटका होऊ शकली. या शोध मोहिमेमध्ये ‘आयएनएस चेन्नई’ ही युद्धनौका सहभागी झाली होती. या अपहरण नाट्याबाबत भारतीय नौदलाने एक व्हीडीओ प्रसिद्ध केला असून त्यात सुटका झालेल्या कर्मचा-यांच्या प्रतिक्रिया दाखविण्यात आल्या आहेत.
अंधारात काढला पळ
भारतीय नौदलाच्या कमांडोंनी या जहाजावर प्रवेश केल्यानंतर त्यांना तिथे एकही घुसखोर आढळून आला नव्हता. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या चाच्यांनी पळ काढला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ज्या जहाजावरून हे चाचे व्यापारी जहाजावर घुसले त्या संशयित जहाजाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.