सोलापूर : वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व तेलंगणाचे आमदार टी राजासिंग तसेच भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केले. या मोर्चात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते.
मोर्चाला प्रचंड अशी गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अभिवादन करून हा मोर्चा पुढे बाळीवेस चौक, मधला मारुती, कौंतम चौक मार्गे यांना चौकात सभेच्या स्थळी गेला परंतु मधल्या वाटेत मधला मारुती ते कौंतम चौक दरम्यान असलेल्या काही दुकानांवर मोर्चा सहभागी झालेल्या काही युवकांनी हुल्लडबाजी करत दगडफेक केली. त्यामुळे गोंधळ उडाला, परंतु बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी मोर्चा पुढे गेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे पाहायला मिळाले. सध्या या भागांमध्ये तणाव असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आल्याचे चित्र आहे.