२ चिमुकल्या गंभीर, मृत अश्विनी मोहिते प्रसिद्ध शालेय कुस्तीपटू
धाराशिव, नळदुर्ग : प्रतिनिधी
नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या उपली बुरुजावरून पडल्याने प्रसिद्ध महिला आणि त्याच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ३ वर्षांच्या २ जुळ््या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. गुरुवारी (दि. ३) दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. मृत्युमुखी पडलेल्या अश्विनी मोहिते या शालेय जीवनात नावाजलेल्या कुस्तीपटू होत्या. त्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील रहिवासी होत्या.
अश्विनी मनोहर मोहिते-पौळ (२८, रा. अंबुलगा, ता. निलंगा, जि. लातूर), अजिंक्य पौळ (५) अशी मृतांची नावे आहेत. जुळ््या मुली वीरा व क्रांती या गंभीर जखमी झाल्या आहेत. अश्विनी यांचे माहेर उमरगा तालुक्यातील व्हंताळ आहे. शालेय जीवनपासूनच अश्विनी यांना कुस्तीची आवड होती. त्यांनी राज्यस्तरापर्यंतच्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. कुस्तीसाठी वडील तानाजी मोहिते यांनी अश्विनीला प्रोत्साहन दिले होते.
अश्विनी मोहिते मुलगा आणि दोन मुलींसह गुरुवारी किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. किल्ल्यातील उपली बुरुजावरून चौघेही पडले. त्यात अश्विनी आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमी मुलींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अपघात की आत्महत्या?
अश्विनी मोहिते आणि त्यांच्या तीन मुलांचा उपली बुरुजावरून पाय घसरला की अश्विनी मोहिते यांनी मुलांसह आत्महत्या करण्यासाठी उडी मारली, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, अश्विनी या गेल्या ३ महिन्यांपासून माहेरी व्हंताळ (ता. उमरगा) वडील तानाजी शिवाजी मोहिते यांच्याकडे राहत होत्या. त्यांचे पती मनोहर पौळ हे मुंबई येथे रिक्षाचालक असल्याचे सांगितले जात आहे. अश्विनी या मुंबई मेट्रो पोलिसांत कार्यरत होत्या, असेही सांगितले जात आहे.
















