अकोला : कर चुकवल्याप्रकरणी यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’चे बँक खाते आयकर विभागाच्या वतीने गोठवण्यात आले आहे.
९ कोटी २६ लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. कलम २२६ (३) अंतर्गत आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. तर, कर चुकवेगिरीप्रकरणी आयकर विभागाने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
मागच्या आठवड्यात आयकर विभागाने खासदार भावना गवळी यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर खासदार गवळींनी दोन दिवसांपूर्वी अकोला आयकर कार्यालयात आपल्या सीएच्या माध्यमातून कागदपत्रे सादर केली होती. मात्र, आयकर विभागाचे समाधान न झाल्याने खाते सील करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’ या संस्थेने २०१३ ते २०१६ मध्ये आयकर चुकवल्याचा आरोप असून, त्यामुळेच ही कारवाई करण्यात येत आहे.
गवळींनी खाते सील झाल्याची बातमी फेटाळली
मात्र, खासदार गवळींनी संस्थेचे खाते सील झाल्याची बातमी फेटाळली. अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संस्थेत काही लोकांनी १८ कोटींचा अपहार केल्याचा दावा गवळी यांनी केला आहे. तसेच, संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटींची रक्कम गहाळ झाल्याची तक्रार देखील गवळी यांनी दिली होती.
यापूर्वी देखील आल्या होत्या नोटिसा…
भावना गवळी या सध्या सत्ताधारी शिंदे गटात आहेत. यापूर्वी त्या उद्धव ठाकरे गटात होत्या. तर, यापूर्वी देखील याच प्रकरणात त्यांना नोटीस आल्या होत्या. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील १९ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप असून, आयकर विभागाला याच १९ कोटींचा हिशेब हवा आहे. तर, उद्धव ठाकरे गटात असताना देखील याच प्रकरणात खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली होती. त्याचवेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते. विशेष म्हणजे नोटीस आल्यावर देखील भावना गवळी चौकशीला हजर न राहिल्यास त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. या काळात भावना गवळी यांना तीन समन्स पाठविण्यात आले होते. मात्र, मागील काही दिवसांत या प्रकरणाची चर्चा बंद झाली होती.