अजित पवार गटाचा मेळावा ठाणे येथे पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर वयाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. वय ८० झाले तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली.
ते म्हणाले, एका वयानंतर थांबायचं असतं. वय झाल्यानंतर थांबायला हवं. पण काही जण ऐकत नाही. हट्टीपणा करतात. राज्य सरकारमध्ये ५८ वर्षांत निवृत्त होतात. काही जण ६२ तर काही जण ६५ मध्ये निवृत्त होतात. काही जण ७५व्या वर्षी निवृत्ती स्वीकारतात. परंतु काही जण मात्र ८० व्या वर्षी थांबत नाही. ८४ वर्षांचे झाले तरी थांबत नाही, काय चाललंय काय, आम्ही आहे ना, आम्ही कुठं चुकलो तर सांगा आम्हाला, आमच्यामध्ये तेवढी ताकद आणि धमक आहे. ४ ते ५ वेळा आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. चांगल्या योजना राबवल्या आहेत, असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवार यांचं नाव न घेता टोला लगावला.
मोदींवर कौतुकाचा वर्षाव
जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताला प्रतिष्ठा मिळाली आहे. नरेंद्र मोदी १८-१८ तास काम करतात. दिवाळीला सुद्धा ते घरी जात नाहीत. भारत सर्व क्षेत्रात सध्या आगेकुच करत आहेत. चंद्रयान देखील यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचले आहे.
कधी कधी गुंडगिरी डोकं वर काढते
ठाणे जिल्ह्यात कोण दादागिरी करतो. कोण दहशत निर्माण करतो. त्यांच्यावर पोलिसांनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार करा, यावेळी तिस-यांदा मोदींना निवडून देण्यासाठी आपण जमलोय असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.