निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मंगळवारी लातूर-जहीराबाद महामार्गावरील मसलगा पाटी येथे बैलगाडी मोर्चासह तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे, जिल्हाध्यक्ष दीपक नरवाडे, तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात निलंगा,निटूर, पानचिंचोली परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतक-यांनी बैलगाड्या व जनावरे महामार्गावर आणून शासनाचे लक्ष दुष्काळी परिस्थितीकडे वेधले. रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निलंगा पोलिस ठाण्याच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मसलगा पाटी परिसरास पोलिस छावणीचे स्वरूप आले होते
. पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिके वाळून गेली असून जनावरांसाठी चा-याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतक-यांनी जनावरांसह आंदोलनात सहभाग घेतला. काही जनावरांच्या पाठीवर ‘मला चारा द्या’ असे फलक लावून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळीह्याविजयकुमार घाडगे म्हणाले की, मराठवाड्यात दुष्काळाचे भीषण चित्र निर्माण झाले असूनही सरकारकडून दुष्काळाबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कृषिमंत्री यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना दिलासा द्यावा. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
















