जालना : ‘‘मुंबईत येताना कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई करणार,’’ असे अजित पवारांनी म्हटले होते. आता मराठा आंदोलक जरांगे-पाटील अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत ‘‘दहा ते पाच जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांचं वाटोळं केलं.’’
दरम्यान, कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना अजित पवारांनी म्हटलं, ‘‘आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि मंत्रिमंडळातील सहकारी प्रयत्नशील आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कुणाचेच दुमत नाही. पण, काहीजण टोकाचं बोलत आहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा आदर करून आपण पुढं जात आहोत. पण, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई करणार. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही,’’ असे अजित पवार म्हणाले.
यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे-पाटलांनी म्हटलं, ‘‘शेवटी त्यांनी पोटातले ओठात आणलेच. पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केलं. दहा ते पाच जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांचं वाटोळं केलं. शांततेत येणा-यांवर कारवाई करून दाखवावी, मग मराठेही शांततेत उत्तर देतील.’’
आम्ही त्याला सरकार मानत नाही
मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना अजित पवार अशी भूमिका का घेत आहेत? या प्रश्नावर जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘अजित पवार अपघातानं सत्तेत आलेला माणूस आहे. तो जर असे बोलत असेल, तर आम्ही त्याला सरकार मानत नाही. मुंबईला जाणार आणि ओबीसीतून आरक्षण मिळवणारच. तू कारवाई कर, तेव्हा मराठेही शांततेत उत्तर देतील.’’