नवी दिल्ली : बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींच्या सुटकेला आव्हान देणा-या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणार आहे. २००२ मध्ये गुजरात दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार झाला होता. यामध्ये ११ जण दोषी सिद्ध झाले होते. गुजरात सरकारने या दोषींना शिक्षेतून सूट दिली होती. याला खूप विरोध झाला, त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
गुजरात सरकारच्या माफी योजनेंतर्गत ११ आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय देण्याची शक्यता आहे. २००२ मध्ये बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी ११ आरोपी गोध्रा येथील सबजेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. गोध्रा ट्रेन आगीच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात मार्च २००२ मध्ये गर्भवती बिल्कीस बानोवर सामूहिक अत्याचार झाला होता. या हिंसाचारात त्यांच्या कुटुंबातील सात जणांचाही मृत्यू झाला होता. तर कुटुंबातील इतर सहा जणांनी पळून जाऊन स्वत:चा जीव वाचवला. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने २१ जानेवारी २००८ रोजी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.