23 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरविलास सहकारी साखर कारखान्यास मानाचा तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार

विलास सहकारी साखर कारखान्यास मानाचा तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार

लातूर : प्रतिनिधी
साखर उद्योगात नवतंत्रज्ञानाचा वापर करून कारखाना गाळप कार्यक्षमता वाढ, उत्पादन क्षमता वाढ, साखर आणि उपपदार्थाची गुणवत्ता सुधारणा आणि यामुळे सभासद व ऊस उत्पादकांना अधिक ऊस दर देणे शक्य झाले आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या संस्थेचा मानाचा राज्य पातळीवरील उत्तर पूर्व विभागातील तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी ता. जि. लातूरला गळीत हंगाम २०२२-२३ साठी जाहीर झाला आहे.

मागील वर्षी कारखान्यास ‘उत्कृष्ट ऊस संवर्धन’ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विलास कारखान्यास सलग २ वर्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांनी बक्षीस दिलेले आहे. यामुळे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकी, खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार, ऊसतोडणी व ऊस वाहतूक ठेकेदार व हितचिंतक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. विलास सहकारी साखर कारखान्यास हा पुरस्कार गुरूवार, दि. ११ जानेवारी २०२४ रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु. पुणे येथे होणा-या भव्य सोहळ्यात राज्यातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, व्हा. चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई आणि सर्व संचालक स्वीकारणार आहेत.

लातूरच्या सर्वांगीण विकासात मांजरा परिवाराचे उल्लेखनीय योगदान आहे. या परिवारातील सहकार आणि साखर उद्योग एक महत्त्वाचा उद्योग आहे. या उद्योगातून शेतक-यांना शाश्वत उत्पन्नाचा कायमस्वरूपी चांगला मार्ग उपलब्ध झाला आहे. या साखर कारखान्यामुळे शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. आदरणीय विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे. हा पुरस्कार विलास कारखान्यास जाहीर झाला आहे, याबद्दल मांजरा परिवाराचे मार्गदर्शक मा. माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार, ऊस तोडणी व ऊस वाहतूक ठेकेदार यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR