जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातील शेतक-यांसाठी काही वर्षांपूर्वी सोयाबीन पिकावर आलेले संकट आजही विसरणे कठीण आहे. सोयाबीन पिकावर २००३-४ मध्ये लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने उभे पीक अक्षरश: फस्त झाले होते. त्या काळात शेतक-यांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शासनाने नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत केली होती. त्यामुळे संकटाच्या काळात सरकारने आपली दखल घेतल्याची भावना शेतक-यांमध्ये निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे प्रत्येक शेतक-याच्या बांधावर जात पंचनामे न करता सरसकट मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. अगदी आठवडाभरात ही मदत शेतक-यांना मिळाली होती. जळकोट तालुक्यातील अनेक गावांमधील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतक-यांनी पीक वाचविण्यासाठी कीटक नाशकांची फवारणी केली; मात्र अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी अपेक्षित परिणाम झाला नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली. या संकटाच्या काळात झालेल्या मदतीची आठवण आजही जळकोट तालुक्यातील ज्येष्ठ शेतकरी सांगतात. सध्याच्या काळातही शेतकरी नैसर्गिक आपत्ती,
पावसातील खंड, अतिवृष्टी, कीड-रोग आणि उत्पादन खर्चाच्या वाढत्या बोजामुळे अडचणीत येत आहेत. सध्या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. अधिकारी तसेच कर्मचा-यांच्या वतीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेले माहिती असताना परत पंचनामे कशासाठी, प्रत्येक शेतक-यांच्या खात्यावर लवकर मदत टाकणे गरजेचे होते.मात्र आता सरकार कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त दिसून येत आहे.
















