सोलापूर (प्रतिनिधी )
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर प्रशालेत जिल्हास्तरीय किशोरी हितगुज मेळावा उत्साहात पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, उपशिक्षणाधिकारी किरणकुमारी कानडी ,गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, वैद्यकीय अधिकारी नीलिमा घोगरे , सरपंच ज्योती कुलकर्णी, समाजसेविका सरोजिनी तमशेट्टी, शिक्षण विस्तार अधिकारी राजशेखर नागणसुरे, जयश्री सुतार, गुरुबाळ सणके, बालविकास अधिकारी भोसले आदी उपस्थित होते.
प्रथम ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात सातशे पन्नास किशोरी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या, आयुष्यात शिस्त व मेहनत महत्त्वाची असते. प्रत्येकांना जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. कष्टाशिवाय फळ नाही.शिस्त व मेहनतीच्या जोरावर नक्कीच यश प्राप्त करता येते असे प्रतिपादन केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचा मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.
त्यांच्या प्रेरणादायी मुलाखतीतून प्राथमिक शाळेपासून ते आजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंतच्या यशोगाथा त्या सांगितल्या. अन्नपूर्णा पुजारी (वडकबाळ) या विद्यार्थीनींने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतून ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी किशोरी हितगुज मेळाव्याचे उद्दिष्टे सांगितले. प्रत्येक उपक्रमांमध्ये किशोरींनी उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे व मंजुषा ईरशेट्टी यांनी केले.
याप्रसंगी सातशे पन्नास किशोरींचे हिमोग्लोबिन रक्त तपासणी शिबिर पार पडला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पोस्टर स्पर्धा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा घेण्यात आले. यशस्वी विद्यार्थिनींना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक निंगराज शिवयोगी, वर्षा पवार, शबनम शेख आदी परिश्रम घेतले.