26.1 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रदिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंबांना प्रत्येकी हजार रुपये द्या

दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंबांना प्रत्येकी हजार रुपये द्या

प्रकाश आंबेडकरांची मोदींकडे मागणी

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. आम्ही २२ तारखेला दिवाळी साजरी करायला तयार आहोत, पण दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना दिवाळी साजरी करण्यासाठी एक- एक हजार रुपये द्यावेत, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले का? असा प्रश्न पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारला. वर्तमानपत्रातून वाचतोय की मला आमंत्रण येणार आहे. मला आतापर्यंत कुठलंही आमंत्रण आलेले नाही, पण मी वाट पाहतोय असे ते म्हणाले.

दुसरे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, की त्या दिवशी देशभरात दिवाळी साजरी करा. मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे मिशन आपण सगळ्यांनी मान्य केले, तसे हेही आम्ही मान्य करु, फक्त आमची मोदींना एवढीच विनंती आहे, की दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना त्यांनी एक- एक हजार रुपये द्यावेत, जेणेकरुन त्यांना दिवाळी साजरी करता येईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘दारिद्रय रेषेखालील कुटुंबांनी त्यांच्याच पैशातून दिवाळी साजरी करायची, असे त्यांचे (मोदी) म्हणणे असेल, आणि म्हणून संबंधित कुटुंबानी तशी दिवाळी साजरी केली, तर त्यांच्या मुलांना महिन्याभरात गोड-धोड खाताना त्याग करावा लागेल अशी परिस्थिती आहे. पंतप्रधानांच्या या इच्छापूर्तीसाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना एक- एक हजार रुपये द्यावे’ अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR