नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणा-या साडेचार वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणातील दोषी आरोपी विजय खैरनार याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
डोंगराळे शिवारात अवघ्या साडेचार वर्षांच्या निरागस बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले होते. यानंतर आरोपीने तिची हत्या केली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुरू होती.
राज्यात पसरली होती संतापाची लाट
या चिमुकलीची हत्या १७ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली होती. डोंगराळे या गावातील चार वर्षांच्या मुलीला आरोपी विजय खैरनार याने चॉकलेट देण्याचे आमिष दिले. चॉकलेट देऊन त्याने च्या चिमुकलीचे अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर तिची हत्या केली. आरोपीने या चिमुकलीचा मृतदेह एका मोबाईल टॉवर जवळ टाकून दिला. चिमुकली घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी तपास सुरू केला. काही वेळानंतर मुलीचा मृतदेह सापडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास केला, आरोपी विजय खैरनार याला अटक केली.
ऍड. उज्ज्वल निकम यांनी सांभाळली जबाबदारी
राज्य शासनाने या खटल्यात सरकारी पक्षाच्या बाजूने लढण्यासाठी ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवून आरोपीविरोधातील पुरावे न्यायालयापुढे मांडले. या पुराव्यांच्या आधारे मालेगावच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी विजय खैरनारला दोषी ठरवले होते. तर आज, १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
रेअरेस्ट ऑफ रेअर गुन्हा
जनतेचा तीव्र आक्रोश आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचे दाखले देत सुमारे ५० मिनिटे टोकदार युक्तिवाद केला. डोंगराळे गावातील लहान मुले आरोपी विजय खैरनार याला दादा म्हणून संबोधत असत. खेळणा-या लहान मुलांमध्ये पीडिता ही एकुलती एक निष्पाप मुलगी होती. त्या नात्याचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेऊन आरोपीने हे अमानवी कृत्य केले.
विचारपूर्वक रचलेला कट
१६ नोव्हेंबर रोजी ही बालिका इतर मित्रांसोबत खेळत असताना तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपी घेऊन गेला. सुरुवातीला आपल्याला कोणी पाहिले आहे का, याची त्याने गावात चाचपणी केली. यावरून हे कृत्य भावनेच्या भरात नसून पूर्णपणे पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले असल्याचे अॅड. निकम यांनी सिद्ध केले.
अमानुष अत्याचार व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
वैद्यकीय पुराव्यांवरून बालिकेवर अत्यंत क्रूर आणि गंभीर स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह मोबाईल टॉवरच्या तारेच्या कुंपणात फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याचा घृणास्पद प्रयत्न केला गेला. या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण २४ साक्षीदार तपासले. यामध्ये बालिकेसोबत खेळणा-या एका ७ वर्षीय मुलाची साक्ष अत्यंत विश्वसनीय ठरली. तसेच, बालिकेला घेऊन जाताना पाहणा-या एका स्थानिक महिलेची प्रत्यक्षदर्शी साक्ष आणि वैद्यकीय अहवाल यामुळे गुन्ह्याची साखळी अचूक जुळली.
अवघ्या तीन आठवड्यांत आरोपपत्र
डोंगराळे येथील या घटनेनंतर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. घटनेनंतर मालेगाव तालुका पोलीस ठाणे आणि तत्कालीन उपअधीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत आरोपी विजय खैरनारला बेड्या ठोकल्या.
फास्ट ट्रॅक सुनावणी
पोलिसांनी अवघ्या तीन आठवड्यांच्या आत न्यायालयात अत्यंत परिपूर्ण व ठोस दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. गेल्या १० महिन्यांपासून या प्रकरणाची दैनंदिन पातळीवर जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू होती. परिवीक्षाधीन अधिकारी, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षक आणि मानसोपचारतज्ज्ञांचे अहवालही न्यायालयात सादर करण्यात आले होते.
पीडितेच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला
खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला पीडितेचे आई-वडील न्यायालयात हजर राहत होते. सुनावणीदरम्यान जेव्हा न्यायालयाने वडिलांना त्यांच्या भावना विचारल्या, तेव्हा त्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता. माझी मुलगी अजूनही पप्पा, मम्मी अशी हाक मारते असा भास होतो. या नराधमाला फाशीच झाली पाहिजे अशी आर्त हाक त्यांनी दिली होती.
अश्रुंचा बांध फुटला
आज न्यायालयाने विजय खैरनारला फाशीची शिक्षा सुनावताच पीडित कुटुंबीयांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. न्यायालयाच्या या निकालानंतर अॅड. उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली की, शासनाच्या मनोधैर्य योजनेतून व न्यायालयीन आदेशांनुसार पीडितेच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
निकालाचे राज्यभरातून स्वागत
या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव सत्र न्यायालय परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी पक्षाला अॅड. संजय सोनवणे, अॅड. स्रेहा शर्मा-ठाकरे आणि अॅड. हर्षल तिवारी यांनी सहकार्य केले. निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधमाला फाशीची शिक्षा झाल्याने समाजातील अशा विकृत प्रवृत्तींना जरब बसेल आणि या निकालामुळे कायद्यावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, अशी प्रतिक्रिया न्यायालय परिसरातून व जनमानसातून व्यक्त होत आहे.
















