वाशिम : कर्नाटकमधील निवडणूक रेकॉर्ड गहाळ होणे, पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मशिन्स जळणे आणि कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना केवळ एसआयआरच्या नावाखाली कोट्यवधी मतदारांची नावे मतदारयादीतून वगळणे, हे सर्व प्रकार निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा हस्तक बनल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
वाशिम येथे पत्रकारांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची संशयास्पद भूमिका, दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांना जाहीर झालेली ५ हजारांची तुटपुंजी मदत, मंर्त्यांचे चोचले आणि व्हीआयपी गाड्यांसाठी सरकारने मंजूर केलेल्या १२ कोटींच्या उधळपट्टीवरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला.
ज्ञानेश कुमार भाजपचा हस्तक
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून घेतलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, कर्नाटकमधून निवडणुकीचे अधिकृत रेकॉर्ड गायब होणे, बंगालमध्ये ईव्हीएम मशिन्स जळून खाक होणे आणि मतदारांची नावे बेकायदेशीरपणे एसआयआरच्या माध्यमातून यादीतून उडवणे, हे देशातील लोकशाही संपवण्याचे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे. या संपूर्ण मतचोरी प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी मोदी आणि शहा ही रंगा आणि बिल्लाची जोडी तो मी नव्हेचचे नाटक करत आहे. मात्र, जनता आता सर्व जाणून चुकली आहे. लोकशाहीचा गळा घोटणा-या ज्ञानेश कुमार यांच्यावर तातडीने देशद्रोह आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून खटला चालवावा व त्यांना गजाआड करावे.
अन् मंत्री खातात काजू-बदाम
राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि सरकारच्या आर्थिक उधळपट्टीवर ताशेरे ओढताना सपकाळ म्हणाले, दुष्काळात सर्वस्व गमावून बसलेल्या शेतक-याला द्यायला सरकारकडे केवळ ५ हजार रुपये आहेत. शेतक-यांना मदत देण्याची वेळ येते तेव्हा सरकारकडे पैसे नाहीत अशी रड सुरू होते. एका बाजूला शेतकरी हवालदिल झालेला असताना सत्ताधारी मंत्री मात्र खुशाल जनतेच्या पैशावर काजू-बदाम खात आहेत. दुष्काळात शेतक-यांना वा-यावर सोडून व्हीआयपींसाठी १२ कोटी रुपयांच्या नव्या, चकचकीत आणि वातानुकूलित गाड्या खरेदी केल्या जात आहेत. या सरकारचा बेशरमपणा वेळोवेळी त्यांच्या वर्तणुकीतून जनतेसमोर उघड होत आहे.
विलासराव, पृथ्वीराजांचे दिवस विसरलात का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ हजार रुपयांच्या मदतीला दिवाळीची सर्वात मोठी मदत म्हटल्याचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चांगलेच संतापले. शेतक-यांना केवळ ५ हजार रुपयांची मदत देऊन स्वत:ची पाठ थोपटून घेणा-या सत्ताधा-यांना लाज वाटली पाहिजे. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशी शेतक-यांच्या खात्यात थेट नुकसानभरपाईचे पैसे जमा करणारे दिवंगत विलासराव देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार महाराष्ट्राने पाहिले आहे.
संकटाच्या काळात शेतक-यांच्या खात्यात तातडीने मदत पोहोचवण्याची काँग्रेसची परंपरा असताना, आज अवघे ५ हजार रुपये देऊन आतापर्यंतची सर्वात मोठी मदत केली असा टेंभा मिरवण्याचा हा पोटगेपणा आणि बेशरमपणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठून शिकले आहेत, हे त्यांनी एकदा महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट करावे, असा घणाघाती सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
















