नवी दिल्ली/जळगाव : दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी खरेदी करणा-यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. या आठवड्यात केवळ चार दिवसांत चांदीच्या दरात १६,००० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली, तर वायदे बाजारात (फ्युचर्स ट्रेडिंग) ती आता तिच्या उच्चांकी दरापेक्षा सुमारे २.२४ लाख रुपये कमी दराने उपलब्ध आहे. त्यामुळे सोनेचांदी स्वस्त झाले आहेत.
सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज पासून ते देशांतर्गत बाजारापर्यंत मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
गेल्या आठवड्यात केवळ चार दिवसांच्या व्यवहारात चांदीचा दरवाढीचा फुगा फुटला आणि देशांतर्गत बाजारात तिच्या किमतीत १६,००० पेक्षा जास्त घसरण झाली. दरम्यान, एमसीएक्सवर चांदी आता तिच्या उच्चांकी किमतीपेक्षा अंदाजे २.२४ लाख कमी किमतीत उपलब्ध आहे. तसेच सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे.
दिवाळीआधीच सोने चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून चांदी प्रति किलोग्राम २ लाख रुपयांच्या खाली आली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव १६ ऑक्टोबर रोजी २,१०,९१८ रुपयांवर बंद झाला आणि शुक्रवारी तो १,९४,४१५ रुपयांपर्यंत घसरला, म्हणजेच प्रति किलोग्राम १६,५०३ रुपयांची घसरण झाली. वायदे बाजारातही चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ४ डिसेंबर रोजी मुदत संपणा-या चांदीचा एक किलो, जो १६ ऑक्टोबर रोजी एमसीएक्सवर २,११,१८७ रुपयांना उपलब्ध होता, तो शुक्रवारी १,९६,१०० रुपयांपर्यंत कोसळला. त्यानुसार, चार दिवसांत वायदे बाजारात चांदीच्या दरात प्रति किलो १५,०८७ रुपयांची घसरण झाली.
चांदी २ लाख २३ हजारांवर
या आठवड्यात चांदीच्या दरात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे, हा मौल्यवान धातू आता त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी दराच्या निम्म्याहून कमी दरात उपलब्ध आहे. हा उच्चांकी दर यावर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ४,२०,०४८ वर पोहोचला होता. सध्याच्या दराच्या तुलनेत, १ किलो चांदीचा दर आता उच्चांकी दरावरून २,२३,९४८ ने घसरला आहे.
सोनेही घसरले
चांदीच्या दरातील घसरणीसह या आठवड्यात सोन्याच्या दरातही लक्षणीय घसरण झाली आहे. टउ सोन्याच्या दराकडे पाहता, ४ डिसेंबर रोजी मुदत संपणा-या १० ग्रॅम सोन्याचा दर १,४७,९१८ वरून १,४२,१५० पर्यंत ५,७६८ ने घसरला आहे. देशांतर्गत बाजारात त्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४,७९६ ची घट झाली असून, किंमत १,४६,४२६ वरून १,४१,६३० पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे आता सोनेचांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
















