लातूर : प्रतिनिधी
दिनांक २४ ऑक्टोबर या जागतिक पोलिओ दिनानिमित्ताने जगातून पोलिओला हद्दपार करण्यासाठी जग प्रयत्नाची शिकस्त करीत आहे. त्यासाठी रोटरी क्लब लातूर मिडटाउनने ‘कापूसकोंडा’ या लातूर व परिसरात चित्रीत झालेल्या सिनेमाच्या निमित्ताने ४० हजाराची छोटीशी मदत जमा केली, असे अध्यक्ष रोटरी रमेश चिल्ले यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटना, यूनिसेफ यांच्या मदतीने रोटरी इंटरनॅशनलने १९७९ पासून जगातील १२२ देशातील अडीच अब्जाहून अधिक मुलांचे लसीकरण केले गेले. यात अमेरिका २००० साली तर भारत मार्च २०१४ ला पोलिओमुक्त झाला. पण अफगाणिस्तान व पाकिस्तानात अजूनही पोलिओचे रुग्ण आढळत आहेत, म्हणून या देशाबरोबरच इतर देशात त्याची बाधा होऊ नये म्हणून अजूनही त्या देशाच्या शेजारच्या राष्ट्रात लसीकरण करण्यात येते आहे. कारण २०२२ ला अमेरिकेत पुन्हा एक रुग्ण आढळल्याने जगाची चिंता वाढलेली आहे.
पोलिओ प्रतिबंधक लसीकरणासाठी रोटरीच्या जागतिक पोलिओ फाउंडेशनसाठी रोटरी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मदत करीत असते. याचाच एक भाग म्हणून लातूरतील पीव्हीआर टॉकीजमध्ये २५ ऑक्टोबर रोजी निर्माता सचिन मोहिते व लातूरातील तरुण निर्माता अनिरुद्ध अंधोरीकर यांचा पहिला वहिला ‘कापूसकोंडा’ हा ज्येष्ठ कलाकार सचिन पिळगावकर व माधुराणी गोखले यांची प्रमुख भूमिका केलेल्या व लातूर व परिसरातील अंधेरी या अहमदपूरमधील गावात, गंजगोलाई परिसरात चित्रित झालेला सिनेमा म्हणून रोटरीचे दीडशे सदस्याने तिकिटाच्या माध्यमातून ४० हजार रुपये पोलिओ फंडासाठी जमा केले. रोटरीच्या दीडशे सदस्यांनी सिनेमॅटिक अनुभव व कलाकार सचिन पिळगावकर यांच्यासोबत गप्पांच्या निमित्ताने संवाद साधला.
















