25.4 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड

मुंबईत भूखंड घोटाळ्याचा आरोप

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकली. ईडीच्या या पथकात १० ते १२ अधिका-यांचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरू आहे. वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरू असून यामध्ये त्यांच्या भागिदारांच्या घरांचाही समावेश आहे.

जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने ईडी रवींद्र वायकर यांच्यावर अटकेची कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यानिमित्ताने ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात सापडला आहे. यापूर्वी संजय राऊत, अनिल परब या ठाकरे गटातील नेत्यांच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या होत्या. यापैकी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती आणि त्यांना तब्बल तीन महिने तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. रवींद्र वायकर यांची यापूर्वी ईडी चौकशी झाली होती.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यामुळे रवींद्र वायकर लवकरच तुरुंगात जातील, असा इशाराही सोमय्या यांनी अनेकदा दिला होता. परंतु, वायकर यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.

मात्र, आज ईडीच्या पथकाने वायकर यांच्या घरावर धाड टाकून निर्णायक कारवाईच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या सुनावणीचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर ईडीची रवींद्र वायकर यांच्याविरोधातील कारवाई सूचक आणि महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR