एसआयआरदरम्यान वगळली होती सर्व नावे
मुंबई : प्रतिनिधी
कागदपत्रांचे योग्य पुरावे दिल्याने तब्बल ९९.९४ टक्के म्हणजेच १ कोटी २२ लाखांहून अधिक मतदारांची नाव प्रारूप मतदार यादीत पुन्हा समाविष्ट केली जाणार आहेत. अनेक जिल्ह्यांमधील मतदारांनी वेळेत कागदपत्र सादर केल्याने आता त्यांचा ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणा-या अंतिम यादीत समावेश होण्याचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आहे. एसआयआर मोहिमेत नोटीस बजावण्यात आलेल्या सव्वा कोटीहून अधिक मतदारांसाठी हा दिलासा मानला जात आहे.
एसआयआर मोहिमेत नोटीस बजावलेले १.२२ कोटी मतदार पुन्हा यादीत येणार आहेत. ९९ टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी नोटिशीला उत्तर देऊन समाधानकारक कागदपत्रे सादर केल्याने बहुतांश जणांचे प्रारूप मतदार यादीतील नाव कायम ठेवण्यात आले आहे. निवडणूक अधिका-यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एसआयआर अंतर्गत राज्याच्या मसुदा मतदार यादीत विसंगती किंवा नाव चुकीचे असलेल्या १.२ कोटी मतदारांपैकी ९९ टक्के मतदार छाननीत उत्तीर्ण झाले असून, त्यांना प्रारूप मतदार यादीत कायम ठेवण्यात येणार आहे. अंतिम एसआयआर मतदार यादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
राज्यात सुरू असलेल्या मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत नोटीस बजावण्यात आलेल्या १ कोटी २२ लाख २४ हजार ७ मतदारांपैकी ९९.९४ टक्के म्हणजेच साधारण १ कोटी २२ लाख १६ हजार ६६५ मतदारांचे नाव प्रारूप मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करण्यात येणार आहे. कागदपत्रांचे पुरावे दिल्याने त्यांचे नाव पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
पुण्यात मतदारांचे
पत्ते परस्पर बदलले
पुण्यातील मतदारांचे पत्ते परस्पर बदलल्याचे समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्याचबरोबर पत्ते कोणी बदलले याची चौकशी निवडणूक आयोग स्वत: करणार आहे. हे पत्ते बदलल्याने अनेक मतदार २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहिले होते. निवडणूक नोव्हेंबर महिन्यात झाली. त्याच्या आधी ऑक्टोबर महिन्यात मतदारांचे पत्ते बदलले होते.
अद्याप गुन्हा दाखल नाही
देशभरात निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल आणि मतदार याद्यांबद्दल जे काही वातावरण आहे, त्याची आणि त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब म्हणून समोर आलेली आहे, तक्रार जरी दाखल करण्यात आलेली असली तरी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिस याबद्दल खरंच काही कारवाई करतात का, हे पाहणं महत्त्वाचे आहे.
















