लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे दोन महिन्यांपूर्वी आरोपी दीपक घनश्याम वर्मा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तब्बल दोन महिने पोलिसांना चकवा देऊन फरार असलेल्या दीपक वर्माच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळून अटक केली.न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लातूर शहरातील भाग्यनगर इथे राहणारा आरोपी दीपक घनश्याम वर्मा या सोनार काम करणा-याने सोन्याच्या अंगठीत पुष्कराज खडा बसवून देतो शशिकांत पाटील, रा.लक्ष्मी कॉलनी यांची फसवणूक केली होती. ज्यात आरोपी दीपक वर्माने ६ ग्रॅम सोन्याची अंगठी तसेच १५ हजार रुपये घेऊन काहीच परत न देता फसवणूक करुन फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात १२ नोव्हेंबर २०२३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. मात्र तेंव्हापासून आरोपी हा पोलिसांना चकवा देत फरार होता.
मात्र तब्बल दोन महिन्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी दीपक घनश्याम वर्मा याला त्याच्या राहत्या घरातून ८ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास अटक करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी ९ जानेवारी रोजी आरोपी दीपक वर्मा याला न्यायालयापुढे हजर केलं असताना न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील हे अधिक तपास करीत आहेत.