अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारीला रामल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मात्र उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की चारही शंकराचार्य २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. कारण हे सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन आहे.
तसेच पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे ‘शास्त्राविरुद्ध’ कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते.
चार शंकराचार्य २२ जानेवारीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. आमच्या मनात कुणाच्या प्रती द्वेष नाही. मात्र हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांनाही तसे करण्यास सुचवणे, ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात गुंतलेले लोक हिंदू धर्मातील नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
मंदिराचे बांधकाम पूर्ण न करता प्रभू रामाचा अभिषेक सोहळा आयोजित करणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वांचे पहिले उल्लंघन आहे. एवढी घाई करण्याची गरज नव्हती, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले.