मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचविले. तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भाजपसोबत घेऊन संरक्षण दिले असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे शालिनीताई पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यात, पूर्वीच्या जनसंघाने शिखर बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणा-या अजित पवार यांना सोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणी प्रतिक्रिया देताना शालिनीताई पाटील म्हणाल्या की, ‘भारतीय जनता पक्षाचे मूळ नाव जनसंघ आहे. मग त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणजेच भारतीय हे नाव वापरायचा अधिकार कोणी दिला. महाराष्ट्रातील काही नेते माझे ऐकतात, त्यांना मी पत्र लिहून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्याबाबत लढण्यासाठी विनंती केली आहे. अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होईल.
शरद पवारांच्या वयावरून बोलण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला. अजित पवारांना हे प्रश्न विचारण्याचा अधिकार काय आहे. शरद पवार ठरवतील त्यांना कधी रिटायर व्हायचं आहे. उद्या मला देखील मी ९२ वर्षांची असल्याने वेडे ठरवतील, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.