धुळे : सोनगीर येथील कारागिरांनी बनविलेले २०० कलश अयोध्येला पोहोचल्याच्या आनंदात पुन्हा साखर पडली असून विशेष नक्षीकाम केलेले तीन कलश जय श्रीरामाच्या जयघोषात अयोध्येला पाठविण्यात आले.
तत्पूर्वी कलशाची विधिवत पूजा करण्यात आली. कलशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. वेदपंडीत केशव अयाचित यांनी पौरोहित्य केले.
धुळ्यातील दानशूर विशाल चंद्रकांत केले यांनी येथील उदय चंपालाल कासार यांच्याकडून दोनशे कलश घेतले. ते कलश येथील बिपिन कासार तसेच तांबट व गुजराथी कासार समाजातील कारागिरांनी बनवले होते.
प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागासाठी ते कलश अयोध्येला पोचविण्यात आले. मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रभू रामचंद्रांच्या चरणी तीन विशेष कलश नुकतेच पाठवले गेले. त्यांना श्रीरामलला स्थपती कलश, श्रीरामलला शांती कलश व श्रीरामलला निद्रा कलश असे संबोधले जाते. तीनही कलशावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षी, पाने कोरलेली आहेत. येथील दुर्गादेवी मंदिरात कलशाचे पूजन करून दर्शनासाठी ठेवले होते.