पालम : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या पालम येथे दि.१० जानेवारी रोजी बालविकास बचत बँकेचे उद्घाटन भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर राहूल चिकुर्डेकर व पालम पोस्ट ऑफिसचे अर्जुन माटोरे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक रामराव रोकडे होते. लहान वयातच मुलांना बचतीची सवय लागावी, चॉकलेट, चिप्स अशा स्वरूपाचे पदार्थ खाण्याऐवजी ते पैसे बचत करून शालेय जीवनातच बँकेचे व्यवहार लक्षात यावेत या हेतूने शाळेत बचत बँक स्थापन करण्यात आली आहे. त्याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होईल व विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होईल असे मुख्याध्यापक रोकडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना बँकेचे मॅनेजर यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक विनियोग, पैशाचे व्यवहार, बचत बँकेची आवश्यकता व महत्त्व समजावून सांगितले आणि शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.