मोहाली : मोहाली येथील पहिल्या टी २० सामन्यात अफगाणिस्तान संघाने निर्धारित २० षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात १५८ धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी याने विस्फोटक फलंदाजी केली. नबीने २७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. नजीबुल्लाह जादरान याने अखेरीस फिनिशिंग टच दिला. भारताकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी १५९ धावांचे आव्हान मिळाले आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या मैदानात अफगाणिस्तान संघाने संयमी सुरुवात केली. इब्राहिम जादरान आणि रहमानुल्लाह गुरबाज यांनी ५० धावांची सलामी दिली. कर्णधार जादरान याने २२ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. तर गुरबाज याने २८ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २३ धावांची खेळी केली. अजमतुल्लाह उमरजई याने तिसऱ्या क्रमांकावर संयमी आणि महत्वाची खेळी केली. पण रहमत शाह बाद झाल्यामुळे अफगाणिस्तानची धावगती मंदावली होती. रहमत शाह याला फक्त तीन धावाच करता आल्या.