धाराशिव : प्रतिनिधी
दुचाकीवर बसून जाणा-या दोघांना पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेत वडगाव जहांगीर ता. कळंब येथील एका तरूणाचा मृत्यू झाला. किरण मुंडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. हा अपघात येडशी टोलनाक्याजवळ झाला होता. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे १० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश रामकिसन सावंत हळदगाव ता. कळंब व किरण मुंडे, रा. वडगाव जहागीर ता. कळंब हे दोघे दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी हॉटेल शेतकरी राजा जवळ येडशी टोलनाका येथे आली असता पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात अविनाश सांवत गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेले किरण मुंडे हे गंभीर जखमी होवून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार हा अपघाताची माहिती न देता व जखमीस उपचार कामी दवाखान्यात न नेता पसार झाला. या प्रकरणी अविनाश सावंत यांनी दि.१० जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.