सिंहभूम : झारखंडच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ‘प्रयास-सिटी बजाओ, स्कूल बुलाओ’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात शाळा सुरू होण्याच्या वेळेला गावात शिट्टी वाजवून सर्व विद्यार्थ्यांना सूचित केले जाते.
झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील पोटका विभागात येणा-या तांग्रेनमधील सरकारी माध्यमिक शाळेने काही दिवसांपूर्वी या उपक्रमाची अंमलबजावणी केली. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतही वाढ झाली. शिट्टीच्या आवाजामुळे शाळेत महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित असणारे विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊ लागले, अशी माहिती शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अरविंद तिवारी यांनी दिली.
काय आहे उपक्रम?
‘सीटी बजाओ, स्कूल बुलाओ’ या अनोख्या उपक्रमात गटप्रमुख इतर विद्यार्थ्यांसह गावात दररोज सकाळी शिट्ट्या वाजवित सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सूचना करतो. हा उपक्रम सुरू केल्यापासून गैरहजर विद्यार्थी पुन्हा नियमितपणे शाळेत येऊ लागले आहेत. उपक्रमाला एवढे यश मिळाले की दीर्घकाळ शाळेत न आल्याने शाळाच सोडून दिली, असे ज्या विद्यार्थ्यांबद्दल वाटत होते, ते विद्यार्थीही पुन्हा शाळेत दाखल झाले.