नागपूर : राज्यात प्रतिबंधित अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांच्या वतीने कडक धोरण राबविण्यात येत आहे. असे असले तरी कुठल्या ना कुठल्या छुप्या मार्गाने या अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी नवनवीन शक्कल हे तस्कर लावत असतात. दरम्यान, नागपूर पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ट्रकच्या कंटेनर मध्ये वेगळा कप्पा करून तब्बल ५०० किलो गांजा छुप्या पद्धतीने तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन आरोपीसह तब्बल ६९,७६००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या धडक कारवाई मध्ये छुप्या पद्धतीने अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपींना घटनास्थळांवरून पळ काढण्यात यश आले आहे. पकडण्यात आलेला गांजाचा माल हा विशाखापट्टणम येथून आणलेला होता आणि बिहार येथे नेला जात होता. राजस्थान येथील शब्बीर जुममे खान आणि हरियाणा येथील मूनवर आझाद खान असे पकडण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून गाडी मालक हाफिज जुमे खान आणि इतर एक आरोपी फरार झाले आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहे.