बुलढाणा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज ४२६ वी जयंती. राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली, तर राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आले आहे.
सकाळपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांतून नागरिक जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करत आहेत. त्यामुळे सिंदखेडराजा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. शहरासह तालुक्यातील जाधव वंशजांनी सपत्नीक महापूजा केली. यावेळी राजे विजयसिंह जाधव, शिवाजीराजे जाधव, रमेश राव व निर्मला राजे जाधव, अभय सिंह राजे जाधव, विठ्ठल राजे जाधव, आशिष राजे जाधव यांच्यासह किनगाव राजा, उमरद, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा येथील वंशज यावेळी उपस्थित होते.