मंद्रूप – देशात जातीपाती आणि धर्माच्या नावाने राजकारण सुरू आहे. असे राजकारण फार दिवस चालणार नाही. मोदी आणि भाजपने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवित फसविले आहे. देशात प्रचंड महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे, जगणे मुश्किल झाले आहे.
देश भांडवलदारांच्या हातात जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी जनतेने काँग्रेसला साथ द्यावी. सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे याच उमेदवार असून त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. कार्यकत्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
मंद्रूप येथे जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे प्रदेश सचिव अनंत म्हेत्रे यांनी त्यांच्या शेतात नेतेमंडळी व कार्यकत्र्यांसाठी हुरडा पार्टी व कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता, यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, दक्षिण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती अशोक देवकते, मोतीलाल राठोड, सिकंतरताज पाटील, महिला तालुकाध्यक्ष अरूणा बेंजरपे, जगन्नाथ म्हेत्रे, वागेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.