सांगोला – दूध वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकाने दारूच्या नशेत सावे (ता. सांगोला) येथील गाव कमानीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून पिकअप वाहनाचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. देविदास दत्तात्रय भोसले (वय ३२, रा. लक्ष्मी दहिवडी ता. मंगळवेढा) असे अपघातात मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे.
सदर पिकअपवर चालक म्हणून देविदास हा काही दिवसांपासून कामास होता. त्यास दारू पिण्याचे व्यसन होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दूध डेअरीतून दुधाचे कॅन्ड पिकअपमध्ये घेऊन सांगोला येथील गोकूळ दूध डेअरी येथे दूध घालण्याकरिता गेला होता. पिकअप चालकाने सावे गावातील कमानीला दारूच्या नशेत जोराची धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी होऊन बेशुध्द अवस्थेत पडल्याची माहिती सावे येथील नागरिकांनी दिली. गंभीर जखमी झालेल्या देविदास यास सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.