सोलापूर : कुर्डूवाडी येथील टेंभुर्णी रस्त्यावर असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या पशुधन विकास अधिकाऱ्याने दवाखान्याच्या कार्यालयातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. तणावातून त्यांनी जीवन संपवल्याची चर्चा पशुधन विभागात होत आहे. डॉ. विश्वनाथ जगाडे (वय -३९) , परभणी, स. कुर्डूवाडी) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
जगाडे हे मूळचे परभणी येथील असून, कुर्दुवाडी येथे गेल्या दोन वर्षापासून पशुधन विभागात पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. नागरिकांनी ही खबर पोलिसांना दिली. पोलिसांनी नोंद आकस्मित म्हणून केली आहे. पोलिसांनी पंचनामा केला. त्यांचा मृतदेह कुईवाडीतील ग्रामीण रुग्णालयात आणला. आत्महत्येबाबत मात्र नेमके कारण समजू शकले नाही. सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. शासनाची मदत असेल ती लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.