नागपूर : पतंगाच्या नादात एका दहा वर्षीय मुलाला उच्च दाबाचा विजेचा धक्का लागल्याने तो ४५ टक्के जळाला. यामध्ये त्याचा उजवा पाय कापावा लागला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो मृत्यूशी संघर्ष करीत आहे.
समतानगर येथील रहिवासी असलेला हा चिमुकला १० जानेवारी रोजी सायंकाळी पतंग उडवीत होता. यावेळी त्याचा पतंग उच्च दाबाच्या विद्युत लाईनवर अडकला. पतंग काढण्याच्या प्रयत्नात असताना त्याला उच्च दाबाच्या विजेचा जबर धक्का बसला.
हा शॉक इतका भयानक होता की काही क्षणांतच तो ४५ टक्के जळाला. यात त्याच्या उजव्या पायाची बोटेच उडाली. त्याचे दोन्ही हात आणि डावा पायही जळाला. त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मुलाची प्रकृती चिंताजनक असून त्याचा उजवा पाय निळा पडल्याने कापावा लागला. त्याचबरोबर उजव्या हाताचा खांद्याखालचा भागही निळा पडल्याने तो कापावा लागला. त्याचा छातीपासून डावा हात व पाय जळाला आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.