नवी दिल्ली : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार डेव्हिड टीगेरची हकालपट्टी केली. त्याने इस्रायलचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
क्रिकेट साऊथ आफ्रिकेने संघातील खेळाडू आणि खुद्द डेव्हिडला धोका असून सामन्यावेळी हिंसाचार होऊ शकतो असे सांगत त्याला कर्णधारपदावरून हटवले.यानंतर आता डेव्हिड टीगेरने प्रतिक्रिया दिली. तो म्हणला की, मी २३ ऑक्टोबर २०२३ ला केलेले वक्तव्य हे इस्रायल सैनिकांच्या त्यांच्या नागरिकांचे संरक्षण करणे आणि हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची स्तुती करणारे होते.
मी माझे वक्तव्य हे वैयक्तिकरीत्या केले होते. त्याचा मी ज्या संघाचे प्रतिनिधित्व करतोय त्याच्याशी कोणताही संबंध नव्हता. मला माझे वक्तव्य अशा प्रकारे घेतले जाईल आणि तीव्र प्रतिक्रिया येतील असे वाटले नव्हते. तो माझा भाबडेपणा होता.
डेव्हिड पुढे म्हणाला की, मी माझे वक्तव्य हे सहजरीत्या केले होते. यापूर्वी मी कोणाचा सल्ला घेतला नाही याबाबत मला खेद आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की माझ्या वक्तव्याचा क्रिकेट साऊथ आफ्रिकेचा किंवा मी प्रतिनिधित्व करत असलेल्या कोणत्याही संघाचा काही संबंध नाही.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका सरकारने इस्त्रायलवर नरसंहाराचा आरोप करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्रायलवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे त्यांच्याच १९ वर्षांखालील राष्ट्रीय संघाचा कर्णधार हा इस्रायलचे समर्थन करताना दिसतोय.