29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रशालेय पोषण आहारात अळ्या, लेंड्या

शालेय पोषण आहारात अळ्या, लेंड्या

सिल्लोड : तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराच्या तांदळाची शुक्रवारी सकाळी ११ वाजता ग्रामस्थांनी पाहणी केली. त्यात अळ्या व उंदराच्या लेंड्या आढळल्यामुळे पालकांनी चांगलाच राडा केला.

वांगी बुद्रुक येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून त्यात १३३ विद्यार्थी शिक्षण घेतात. शुक्रवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्याने या कार्यक्रमासाठी सरपंच बापूराव काकडे व पालक शाळेत उपस्थित होते. जयंती साजरी करताना पोषण आहार घेऊन ठेकेदारांची गाडी आली व त्यांनी पोषण आहाराचा दहा कट्टे तांदूळ शाळेच्या खोलीत टाकला.

यावेळी तेथे असलेल्या सरपंच बापू काकडे, पालक माधवराव तायडे, प्रकाश काकडे, ईश्वर काकडे, गजानन काकडे, लतीफ शहा, गणेश काकडे यांनी तेथे जाऊन त्या तांदळांची तपासणी केली. तेव्हा त्यात चक्क अळ्या व उंदरांच्या लेंड्या दिसल्या. त्यांनी याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. या निकृष्ट आहारामुळे जर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली तर याला कोण जबाबदार राहील, असे मत यावेळी पालकांनी व्यक्त केले.

सदर पोषण आहार हा ठेकेदार पुरवठा करतो. याच्याशी आमचा संबंध नसतो. शुक्रवारी वांगी बु. येथे पुरवठा झालेल्या तांदळात अळ्या व उंदराच्या लेंड्या निघाल्याची तक्रार आली आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला कळवले असून त्याने आहार बदलून देतो, असे सांगितले आहे. तो आहार वापरू नये, अशा सूचना शिक्षकांना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR